Home Cities जळगाव ‘नारी सामर्थ्याची नवी पहाट’ कार्यक्रम जळगावात उत्साहात 

‘नारी सामर्थ्याची नवी पहाट’ कार्यक्रम जळगावात उत्साहात 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महिलांच्या स्वसंरक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचा संदेश देणारा ‘नारी सामर्थ्याची नवी पहाट’ हा प्रेरणादायी कार्यक्रम जळगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शहरातील मोठ्या संख्येने महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मेजर मैत्रेयी दांडेकर आणि आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणाऱ्या माहेश्वरी सरनोबत उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी स्वसंरक्षणाविषयी महत्त्वपूर्ण प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सादर केलेल्या या प्रात्यक्षिकांना उपस्थित महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या मेजर मैत्रेयी दांडेकर यांचा सत्कार डॉ. रेखा महाजन यांच्या हस्ते करण्यात आला, तर माहेश्वरी सरनोबत यांचा सत्कार सौ. शैलाताई चौधरी यांनी केला.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मेजर मैत्रेयी दांडेकर यांनी महिलांच्या स्वसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या की, महिलांनी संकटाच्या काळात धैर्य, आत्मविश्वास आणि तत्परता कायम ठेवणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात घडणाऱ्या विविध घटनांचा विचार करता महिलांनी केवळ इतरांकडून संरक्षणाची अपेक्षा न ठेवता स्वतः सक्षम होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक महिला आणि युवतीने स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणाऱ्या माहेश्वरी सरनोबत यांनीही उपस्थित महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी आयर्नमॅन या अत्यंत कठीण स्पर्धेचा अनुभव सांगताना या स्पर्धेत ४ किलोमीटर समुद्रात पोहणे, १८० किलोमीटर सायकल चालवणे आणि ७२ किलोमीटर धावणे असे अत्यंत कठीण प्रकार एकाच वेळी पार करावे लागतात, असे सांगितले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत होणारी ही स्पर्धा त्यांनी नामस्मरण आणि साधनेच्या बळावर पूर्ण केल्याचे नमूद केले. स्पर्धा पूर्ण करण्यासाठी १७ तासांचा कालावधी असतो, मात्र गुरुकृपेच्या बळावर त्यांनी ही स्पर्धा १५ तासांत पूर्ण केली. जीवनातील प्रत्येक कृती करताना ईश्वराचे स्मरण आणि श्रद्धा ठेवली तर यश नक्की मिळते, असा संदेश त्यांनी युवतींना दिला.

कार्यक्रमादरम्यान जळगावातील रणरागिणींचा विशेष सत्कार करण्यात आला. वयाची मर्यादा न मानता जिद्दीच्या जोरावर सायकलिंग क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या कामिनी धांडे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यांनी आतापर्यंत सुमारे ५० हजार किलोमीटर सायकलिंग पूर्ण केले आहे. तसेच अवघ्या १५० मिनिटांत ५०० सूर्यनमस्कार, १०० योगासने आणि ७५ योगमुद्रा करून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करणाऱ्या हेतल पिपरिया यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष नीतू परदेशी, महिला मोर्चा उपाध्यक्ष नीला चौधरी, जळगावच्या माजी महापौर सीमा भोळे, भाजप नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे तसेच भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य रेखा वर्मा यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात आदिशक्ती श्री दुर्गादेवी आणि जळगावचे ग्रामदैवत प्रभू श्रीराम यांच्या चरणी प्रार्थना आणि श्लोक पठणाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. क्षितिजा देशपांडे यांनी केले, तर कार्यक्रमाचा उद्देश गायत्री बारी यांनी स्पष्ट केला. कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या विशेष माहितीपर फलक प्रदर्शनालाही उपस्थितांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.


Protected Content

Play sound