काठमांडू, वृत्तसंस्था | नेपाळमध्ये आज (दि.१२) चीनविरोधात निदर्शने करण्यात येवून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा पुतळा जाळण्यात आला. चीनने नेपाळच्या भूभागावर केलेल्या अतिक्रमणाविरोधात सोमवारी हे आंदोलन करण्यात आले. सापतारी, बारदीया आणि कपिलवास्तू जिल्ह्यामध्ये आंदोलक रस्त्यावर उतरले होते. यावेळी चीनविरोधात मोठया प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलकांकडे फलक, बॅनर्स होते. “गो बॅक चायना, नेपाळी भूमी परत करा” अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. चीनने नेपाळच्या ३६ हेक्टर जमिनीवर अतिक्रमण केल्याचा सर्वेक्षण खात्याचा अहवाल समोर आल्यानंतर हे आंदोलन करण्यात आले. हुमला जिल्ह्यातील भगदरे नदीजवळची सहा हेक्टर, कारनळी जिल्ह्यातील चार हेक्टर जमिनीवर चीनने अतिक्रमण केले आहे. हा भाग आता तिबेटच्या फुरांगमध्ये येतो.
सिंधूपालचौक जिल्ह्यातील १० हेक्टर पेक्षा जास्त जमिनीवर चीनने अतिक्रमण केले आहे. आता हा भाग तिबेटच्या न्यालाममध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. सर्वे डाटामध्ये अरुण खोला, कामु खोला आणि सुमजंग जवळचा काही भाग आता तिबेटमध्ये दाखवला गेला आहे. चीनने यापूर्वी सुद्धा अन्य देशांचा भूभाग बळकवण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त नेपाळबरोबरच नव्हे तर भारताबरोबरही अनेक दशकांपासून चीनचा सीमावाद सुरु आहे.