महापालिकेचे दुर्लक्ष; रस्त्यावर पडलेले झाड माजी नगरसेवकांनी हटविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १७, पांझरापोळ टाकी परिसर दत्त मंदिरासमोर चार ते पाच दिवसांपूर्वी आलेल्या वादळामुळे एक मोठे झाड उन्मळून पडले होते. यामुळे परिसरातील मुख्य चौकात वाहतूक आणि नागरिकांची ये-जा करणे कठीण झाले होते. मनपा प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे कारण मनपा अभियंत्यांकडून देण्यात येत होते. अखेर नाइलाजाने माजी नगरसेवक डॉ. विरण सुरेश खडके आणि विजय वानखेडे यांनी नागरिकांच्या मदतीने १० मे रोजी दुपारी २ वाजता स्वतः रस्त्यावर उतरून पडलेल्या फांद्या उचलल्या.

या कामात नगरसेवकांसोबत प्रभागातील चंद्रशेखर अत्तरदे, धनंजय पाटील, गणेश भारंबे आणि अनिल ठाकूर यांनी सक्रिय सहभाग घेतला. या सर्वांनी मिळून ट्रॅक्टर भरून रस्त्यावरील अडथळा दूर केला. नगरसेवकांनी सांगितले की, गेल्या २० ते २५ दिवसांपासून मनपा बांधकाम विभागात मजुरांची कमतरता असल्याने अशा समस्या वारंवार येत आहेत.

या घटनेमुळे मनपा प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करणे अपेक्षित असताना, प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नगरसेवकांनी स्वतः रस्त्यावर उतरून काम केल्याने नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे, परंतु मनपा प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Protected Content