जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या उद्देशाने उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेत स्वच्छता कामकाजात सुधारणा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. शहरातील स्वच्छता व्यवस्थेत कोणतीही अनियमितता किंवा गैरप्रकार सहन केला जाणार नसल्याचा कडक इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शुक्रवारी मनपाच्या 17 व्या मजल्यावरील उपमहापौर दालनात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस आरोग्य विभागाचे सर्व मुख्य आरोग्य निरीक्षक, युनिट प्रमुख, स्वच्छता निरीक्षक तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेताना उपमहापौरांनी शहरातील कचरा व्यवस्थापन, रस्ते व गटार स्वच्छता याबाबत विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी बोलताना उपमहापौर मनोज चौधरी यांनी जळगाव शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. शहरातील सर्व भागांमध्ये घंटागाडी नियमितपणे फिरली पाहिजे आणि नागरिकांच्या घरातील कचरा वेळेवर उचलला गेला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच रस्ते व गटारींची नियमित स्वच्छता राखण्याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
स्वच्छता व्यवस्थेतील कामकाजाबाबत कर्मचाऱ्यांकडून नेमून दिलेली कामे काटेकोरपणे करून घेण्यात यावीत, असेही त्यांनी सांगितले. काम न करणाऱ्या किंवा वारंवार गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नये, असे स्पष्ट करत त्यांनी शिस्तीचे पालन करण्यावर भर दिला.
यावेळी हजेरी व्यवस्थेबाबतही उपमहापौरांनी स्पष्ट निर्देश दिले. स्वच्छता कामगारांची हजेरी मुकादमांकडून न घेता ती स्वच्छता निरीक्षकांनी स्वतः घ्यावी, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे कामगारांची बोगस हजेरी लागण्याचे प्रकार टाळता येतील. तसेच मक्तेदारांकडून कोणत्याही प्रकारची अनियमितता होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
स्वच्छता कामकाजात नियमभंग, चुकीची हजेरी, खोटी माहिती देणे किंवा कामात हलगर्जीपणा करणे अजिबात सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा उपमहापौरांनी बैठकीत दिला. भविष्यात अशा प्रकारच्या तक्रारी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.



