मुंबई प्रतिनिधी । डिजिटल व्यवहारास प्रोत्साहित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना १६ डिसेंबरपासून २४ तास नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. परिणामी, आता ग्राहकांना एनईएफटीद्वारे आर्थिक व्यवहार करणे शक्य होणार आहे.
सध्या ‘एनईएफटी’ व्यवहारांसाठीची वेळ सकाळी ८ ते संध्याकाळी ७ अशी आहे. पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी अर्धा दिवस म्हणजेच सकाळी ८ ते दुपारी १ हि वेळ दिलेली आहे. मात्र १६ डिसेंबरपासून आठवड्याचे सातही दिवस २४ तास ही सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.तशा प्रकारची अधिसूचना रिझर्व्ह बँकेने काढली आहे. ‘एनईएफटी’चे व्यवहार विनाअडथळा पूर्ण व्हावेत, यासाठी बँकांनी त्यांच्या चालू खात्यात पुरेशा प्रमाणात रोकड सुलभता ठेवावी, असे निर्देश आरबीआयने बँकांना दिले आहेत. त्याचबरोबर ‘एनईएफटी’ची वेळ वाढल्याची माहिती ग्राहकांना कळावी यासाठी बँकांनी ती दर्शनी भागात लावावी असे ‘आरबीआय’ने म्हटले आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी ऑनलाईन फंड ट्रान्सफर करावे यासाठी आरबीआय कडून प्रयत्न केले जात आहेत. जुलैपासून ‘आरबीआय’ने नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) आणि रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) या दोन ऑनलाईन व्यवहारांवरील शुल्क रद्द केले आहे.