मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नीट-पीजी २०२४ परीक्षेमधील गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या परीक्षा घोटाळ्याचे कनेक्शन राज्यातही पोहोचले आहे. एटीएसच्या पथकाने लातूर येथून दोन शिक्षकांना अटक केली आहे. तर आणखी फरार तिघांचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या शिक्षकांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. राज्यभर नीट परीक्षेत गुणवाढ करून देणाऱ्या सब एजंटचे जाळे पसरले असल्याची कबुली या शिक्षकांनी चौकशीत दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २८ जणांची यादी काढली असून त्यांची देखील चौकशी केली जाणार आहे. अटक करण्यात आलेल्या दोन शिक्षकांना २ जुलै पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
नीट परीक्षा घोटाळ्यामुळे लाखो मुलांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. हे रॅकेट लातूर पर्यंत असल्याने राज्यात देखील खळबळ उडाली आहे. या प्रकरणी लातूर जिल्हा परिषद शाळेच्या दोन शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे विद्यार्थ्यांकडून परीक्षेत गुणवाढ करून देण्यासाठी लाखो रूपये घेत असल्याचे तपासात उघड झाले आहे. मुख्याध्यापक जलीलखाँ पठाण आणि संजय जाधव यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत.
केवळ लातूरच नाही तर राज्यातील अनेक जिल्ह्यात अनेक सब एजंट असून ते विद्यार्थ्यांना हेरून त्यांच्याकडून गुणवाढ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे घेत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या दोन्ही शिक्षकांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी २८ जणांची नावे पुढे आली आहे. पोलिस या २८ जणांनापर्यंत पोहोचले असून त्यांची देखील चौकशी केली जाणार आहे.
या दोघांनी नीट परीक्षेत गुणवाढ करण्यासाठी काही पालकांकडून तब्बल ४ ते ५ लाख रुपये घेतल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, २८ पैकी काही जणांनी त्यांच्या मुलासाठी पैसे दिल्याने पोलिसांचा संभ्रम वाढला आहे. नीट सोबत सरकारी नोकर भरती प्रक्रियेत देखील हे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना आहे. आरोपी शिक्षक जाधव व पठाण यांच्याकडून पैसे घेऊन ते दिल्लीपर्यंत पोहोचवरा उमरगा व आयटीआयमधील सुपरवायझर इरन्ना कोनगलवार व दिल्लीतील एजंट गंगाधर या फरार असलेल्या तीन आरोपींचा शोध पोलिस घेत आहे. यातील गंगाधर हा मूळचा मराठवाड्याचा आहे. सध्या तो उत्तराखंडमध्ये लपून बसला असल्याची माहिती आहे