
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. या भेटीनंतर पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चेला उधान आले होते. परंतू या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची चर्चा झालेली नाही, असे खुद्द शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदी न राहण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल यांनी सादर केलेला राजीनामा काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने फेटाळला असला तरी राहुल राजीनाम्यावर ठाम आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी आग्रह केल्यानंतरही राहुल मानायला तयार नाहीत. त्यात नेत्यांची भेट टाळणाऱ्या राहुल यांनी आज अचानक पवारांचे निवासस्थान गाठल्याने या भेटीचे राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जाऊ लागले आहेत.यातूनच पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली.दरम्यान, यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये साधारण ५० मिनिटं चर्चा झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी पक्ष विलीनीकरणाची शरद पवार यांनी खोडून काढल्यामुळे ही चर्चा फक्त एक अफवाच ठरली आहे.