मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ शिंदे यांच्या बंडाला २० जून रोजी एक वर्ष पूर्ण होत असतांना राष्ट्रवादीने हा दिवस गद्दारी दिवस म्हणून पाळण्याचे ठरविले असून याच्या अंतर्गत राज्यभरात निदर्शने करण्यात येणार आहेत.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी २० जून २०२२ रोजी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर रात्रीच आपली वेगळी चूल मांडत सूरतमार्गे गुवाहाटीला निघून गेले होते. यानंतर राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तारूढ झाले. दोन दिवसानंतर २० जून रोजी या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष गद्दारी दिवस साजरा करणार असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत निर्देश दिले आहेत.
यानुसार, खोक्यांचे राजकारण करून धोक्याने सत्ता बळकावलेल्या गद्दारांची सत्तेतून पायउतार व्हायची वेळ आली आहे. यासाठी ‘गद्दारांचे डोके, खोक्यांनीच केले ओक्के’ ही घोषणा राज्याच्या कानाकोपर्यापर्यंत देऊन या खोके सरकारचा निषेध व्यक्त करावा. शिंदे सरकार हे खोक्यांमुळेच ओक्के केले असल्याने या सरकारचे हे क्षणिक सुखाला उतरती कळा लागली आहे हा विश्वास जनतेला पटवून देण्याचा निर्धार करावा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे. या दिवशी राज्यभरात ठिकठिकाणी एकनाथ शिंदे यांचा निषेध करण्यात येणार आहे.