मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील निमखेडी खुर्द विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पॅनलने यश मिळविले असून यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांना धक्का बसल्याचे मानले जात आहे.
निमखेडी खुर्द विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत कष्टकरी शेतकरी पॅनल चे १२ पैकी १२ उमेदवार विजयी झाले असुन एक उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आलेला आहे. यात शिवसेना शिंदे गट पुरस्कृत सहकार पॅनल चा धुव्वा उडाला आहे
रविवार दिनांक ९ एप्रिल रोजी या सोसायटी ची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी सोसायटी चे सभासद असलेले आमदार चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पत्नी यामिनी पाटील यांनी मतदानाला येऊन मतदानाचा हक्क बजावला. आ चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा बँकेसाठी निमखेडी विकासो मधून ठराव असतो त्यामुळे येथील निवडणूक ही त्यांच्या प्रतिष्ठेची होती. तथापि, त्यांच्या समर्थकांच्या पॅनल चा पूर्णपणे धुव्वा उडाला.
दरम्यान, निवडणूक झाल्यानंतर संध्याकाळी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यावेळी
सर्वसाधारण मतदारसंघात बोराडे संदिप बाबूलाल, डहाके नामदेव पुंडलिक, गवळी अरविंद नारायण, घोगरे नत्थू गजानन, लवांडे दगडू विष्णू, पाटील रवींद्र रामधन आणि पाटील संचलाल चांगो यांचा विजय झाला. यासोबत महिला राखीव मतदारसंघात डहाके शेवंता बाई विक्रम व घोगरे संगीता विनोद यांचा विजय झाला. इतर मागास प्रवर्ग मतदारसंघात लवांडे राजु बाबुलाल व अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात धुंदे पंडित वामन हे कष्टकरी शेतकरी पॅनल चे उमेदवार विजयी झाले. तर याआधी याच पॅनलचे बाबुलाल बंडू तिळे
हे बिनविरोध निवडून आले होते.
अशाप्रकारे १३ पैकी १३ जागी राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत कष्टकरी शेतकरी पॅनल ने सोसायटीवर आपले वर्चस्व प्रस्थपित केले असून समोरच्या शिवसेना शिंदे गट पुरस्कृत सहकार पॅनल चा धुव्वा उडाला आहे. विशेष बाब म्हणजे आमदार चंद्रकांत पाटील हे निमखेडी खु विविध कार्यकारी सोसायटी चे सभासद असून जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक वेळी आ चंद्रकांत पाटील यांचा या सोसायटी मधून ठराव झाला होता. यामुळे येथील पराभव हा एका अर्थाने आ चंद्रकांत पाटील यांना हा झटका मानला जात आहे.
विजयी उमेदवारांचे आ एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, राष्ट्रवादी नेत्या रोहिणी खडसे यांनी अभिनंदन केले आहे.