चाळीसगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क यात्रेत आज जिल्ह्यात परिवर्तनाचा जागर करण्यात आला. यात चाळीसगाव येथील सभेत मान्यवरांनी सत्ताधारी भाजपवर कडाडून हल्लाबोल केला.
येथील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या वतीने संपर्क यात्रा २०१९ निमित्ताने सकाळी अकरा वाजता शहरातील बलराम व्यायाम शाळेच्या प्रांगणात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जेष्ठ नेते अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, माजी मंत्री फौजिया खान, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी आमदार दिलीप वाघ, बापूसाहेब भुजबळ, समता परिषद जिल्हाध्यक्ष सतीश महाजन, अनिल पाटील, प्रदीप देशमुख, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, शशिकांत साळुंखे याच्यासह मान्यवर उपस्थित होते. तालुक्याचे माजी आमदार राजीव देशमुख यांनी प्रास्ताविक केले.
जनतेला मूर्ख बनविण्याचे काम-भुजबळ
माजी मंत्री भुजबळ यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, सध्या जनतेला मूर्ख बनविण्याचे काम सुरू आहे. आगामी निवडणुकीसाठी घोषणांची खैरात सुरू झाली आहे. पन्नास टक्के पेक्षा अधिक आरक्षणासाठी संविधानाला धक्का लावण्याचा प्रयत्न यांनी चालविला आहे. मोदी सरकार संविधान विरोधी असल्याने ते आगामी लोकसभा निवडणुकीत उलथवून टाकण्याचा निर्धार करा हा संदेश या परिवर्तना च्या यात्रेतून देण्यासाठी आलो आहे. असे प्रतिपादन छगन भुजबळ यांनी येथे केले.
जनतेत प्रचंड रोष – धनंजय मुंडे
धनंजय मुंडे म्हणाले की, आमच्या थोरल्या बहिणी पासून ते पणन मंत्री सुभाष देशमुख या सर्वांना शासन पाठीशी घालत आहे. यांच्या घोटाळ्या प्रमाणे महागाई वाढत चालली आहे. यांच्या साडे चार वर्षाच्या राजवटी विरोधात जनतेत प्रचंड रोष आहे. एकशे पंचवीस कोटी जनता संधीची वाट पाहत आहे. छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचे पाप यांनी केले आहे यांना जनता माफ करणार नाही. दुसर्या टप्प्यातील तिसर्या दिवशीची ही सातवी सभा आहे परिवर्तन अटळ आहे. असे ते म्हणाले.
शेतकर्यांचा छळ – अजित पवार
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आम्ही सत्तेत आलो की सातबारा कोरा करू म्हणणार्यांकडून कर्जमाफीसाठी शेतकर्यांचा छळ सुरू आहे. दूध, कापूस, सोयाबीन उसाचा एफ आर पी दर या बाबत शासनाची उदासीनता आहे. कांदा असो वा टोमॅटो यांचे दर कोसळले असल्याने शेतकरी हवालदिल झाला असताना अदानी व अंबानी यांच्या फायद्यासाठी सरकार कारभार केला जातो आहे. चांगले काम करणारे राजीव देशमुख यांनी काय चूक केली होती ते आधी सांगा असा प्रश्न त्यांनी उपस्थिताना विचारून नुसत्या घोषणा देऊ नका खासदार आमदार निवडून आणा असे आवाहन त्यांनी केले.