चोपडा प्रतिनिधी | येथील पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती या दोन्ही पदांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने कब्जा करून आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.
चोपडा येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी सभापतीपदी कल्पना दिनेश पाटील तर उपसभापतीपदी सूर्यकांत खैरनार यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अनिल गावित यांच्या उपस्थितीमध्ये आयोजीत सभेत ही निवड करण्यात आली. या निवडीचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रवादीने भाजपला दूर ठेवत पंचायत समितीवर एकहाती वर्चस्व संपादन केले आहे.
चोपडा पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये अघोषीत युती होती. यानुसार सत्ता वाटपाचे सूत्र ठरविण्यात आले होते. तथापि, या पंचवार्षिकच्या शेवटच्या टप्प्यात हा समझौता तुटला. उपसभापती पदासाठी भाजपचे उमेदवार भरत विठ्ठल बाविस्कर यांना विरोध झाल्याचे दिसून आले. यामुळे राष्ट्रवादीचे सुर्यकांत खैरनार यांनी पुन्हा एकदा उपसभापतीपद स्वतः कडे राखले, तर धानोरा येथील कल्पना दिनेश पाटील यांना सभापती पदावर बिनविरोध संधी मिळाली. उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत सूर्यकांत खैरनार यांच्या बाजूने सहा सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. याप्रसंगी भाजपच्या पल्लवी भिल व सेनेचे एम.व्ही.पाटील यांनी राष्ट्रवादीला सहकार्य केल्याने सूर्यकांत खैरनार यांची निवड शक्य झाली. तर आत्माराम म्हाळके, प्रतिभा पाटील, भूषण भिल आणि उमेदवार भरत वाबिस्कर यांनी सभात्याग केला.
यामुळे आता चोपडा पंचायत समितीच्या सभापतीपदी सभापतीपदी कल्पना दिनेश पाटील तर उपसभापती म्हणून पुन्हा एकदा सूर्यकांत खैरनार हेच विराजमान झाले आहेत.