जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १९ ‘ड’ मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उमेदवार संग्रामसिंग सूर्यवंशी यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात मेहरूण तलावाजवळील बांधावरील भागातून केली असून सामाजिक समतेचे प्रतीक असलेल्या भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून त्यांनी मतदारांशी संवादाला प्रारंभ केला.
या वेळी परिसरातील नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनातील गंभीर समस्या उमेदवारांसमोर मांडल्या. गटारांची दुर्दशा, परिसरातील अस्वच्छता, साचलेले पाणी आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या अडचणी याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला. अनेक वर्षांपासून या भागात मूलभूत सुविधा दुर्लक्षित राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी असून, प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

संग्रामसिंह सूर्यवंशी यांनी नागरिकांच्या तक्रारी शांतपणे ऐकून घेत या सर्व प्रश्नांवर प्राधान्याने उपाय करण्याचे आश्वासन दिले. निवडून आल्यानंतर गटार व्यवस्था सुधारण्यासह स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. विकासाभिमुख आणि पारदर्शक कारभार हा आपला मुख्य अजेंडा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी घरोघरी संग्रामसिंह सूर्यवंशी यांचे औक्षण करण्यात आले.
प्रचारादरम्यान सूर्यवंशी यांनी घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभागातून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. स्थानिक नागरिकांनीही त्यांच्या संवादशील भूमिकेचे स्वागत करत, समस्यांवर तोडगा काढणाऱ्या नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त केली.



