अहमदनगर (वृत्तसंस्था) नक्षलवादाचा प्रश्न बंदुकीने संपणारा नाही. मुळात नक्षलवादी परके नाहीत, ते महाराष्ट्रात जन्मले, महाराष्ट्रातच राहतात.त्यामुळे सरकारने चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केल्यास मी मध्यस्थीसाठी तयार आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. नुकतेच गडचिरोली येथे नक्षलवादी हल्ल्यात पोलिसांचे 15 जवान शहीद झाले. यावर अहमदनगरमध्ये अण्णा हजारे यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.
हल्ल्याने, बंदुकीने, गोळीबाराने प्रश्न सुटणार नाहीत. नक्षलवादी परके नाहीत. ते देखील महाराष्ट्रात जन्मले महाराष्ट्रात राहतात. त्यांनी केलेल्या हल्ल्यात जे जवान शहीद झाले तेही आपलेच. असे असताना बंदुकीने प्रश्न सुटणार नाहीत. सलोख्याने, चर्चेने हे प्रश्न सुटतील, असे अण्णांनी सांगितले. इतकेच नाही तर सरकार नक्षलवाद्यांशी चर्चा करून मार्ग काढणार असेल तर आपण मध्यस्थी करण्यासाठी सहभागी होऊ असेही अण्णा हजारे म्हणाले. सरकारने बोलावले तर मानवतेच्या धर्माने आपण मध्यस्थी करायला जाऊ, असं अण्णांनी म्हटलं आहे. दरम्यान, गडचिरोलीमधील जांभूळखेडा येथे 1 मे रोजी नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंगस्फोटात 15 पोलीस शहीद झाले होते.