मुंबई प्रतिनिधी । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील मंत्र्यांमधील कलगीतुरा चांगलाच रंगला असून आता नवाब मलिक यांनीही त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
मराठा आरक्षणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. मराठा आरक्षणावरून राज्य सरकार केद्राकडे बोट दाखवतंय. केंद्रानेच सगळं करायचं आणि आम्ही मात्र राज्यात माशा मारत बसणार व दिलेले आरक्षण गमावून बसणार हे आणखी किती दिवस चालणार असा टोला फडणवीसांनी राज्य सरकारला लगावला होता. त्यावर आता नवाब मलिकांनी जोरदार पलटवार केला आहे.
यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस, तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे? आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपाने माशा मारणे स्पर्धाही भरवावी! असा शब्दात नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे.