मुंबई प्रतिनिधी । नवाब मलीक यांनी लवंगी फटाके फोडले असले तरी आपण दिवाळीनंतर बाँब फोडू असा इशारा देत, मलीक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच त्यांनी ड्रग पॅडलर राणा सोबतचे संबंध नाकारले आहेत.
आज सकाळी नवाब मलीक यांनी फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याला उत्तर दिले. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मलिकांनी दिवाळीत लवंगी फटाका लावला, आता लक्षात ठेवावं आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेल. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत. त्यांनी माझ्याशी बोलू नये. मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध कसे आहेत याचे पुरावे मी तुम्हाला देणारच आहे. पण शरद पवारांनाही हे पुरावे देणार आहे. दिवाळी संपण्याची वाट बघा. आता त्यांनी सुरुवात केली.
फडणवीस पुढे म्हणाले की, मलिकांनी चार वर्षापूर्वीचा फोटो ट्विट केला आहे. त्यांना हा फोटो आज सापडला. रिव्हरमार्च ही संघटना आहे. त्यांना रिव्हर अँथमवर गाणं करायचं होतं. त्यावेळी हा फोटो घेण्यात आला आहे. चौगुले म्हणून आहेत. त्यांनी विनंती केली म्हणून आम्ही त्या मोहिमेशी जोडलो गेलो. माझी पत्नीही त्यांना मदत करत होती. त्यांनी गाणं तयार केलं होतं. त्यावेळी हे फोटो काढले होते. माझ्याही सोबत फोटो काढले आहे. पण मलिक यांनी जाणीवपूर्वक पत्नीसोबतचा फोटो शेअर केला. त्यामागची मानसिकता समजून घेतली पाहिजे, असं सांगतानाच मलिक यांनी माझा फोटो ट्विट केला नाही. कारण माझ्यासोबत कोणीही फोटो काढू शकतो हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे माझ्याबरोबरचा फोटो ट्विट केला असता तर आरोप फुसका ठरला असता, असं ते म्हणाले.
दरम्यान,हे रिव्हर मार्च सोबत आलेले हे लोकं होते. आमचा त्यांच्याशी कोणताही संबंध नाही.भाजपचं ड्रग्ज कनेक्शन आहे असं मलिक म्हणाले. पण मलिकांचे जावई ड्रग्ज सोबतच सापडले आहेत. मग हाच नियम लावला तर संपूर्ण एनसीपी ड्रग्ज माफिया झाली पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.