पाचोरा प्रतिनिधी । अमेरिका होस्टन येथील ज्युनिअर ऑलम्पिक स्पर्धेमध्ये पाचोरा येथील मूळ रहिवासी सचिन पाटील यांचे पुतणे व सध्या पुणे विद्यापीठ येथे कार्यरत असलेल्या प्रा. नितीन पाटील भार्गव आणि शिवम या मुलांनी पाचोऱ्याचे नाव ज्युनिअर ऑलम्पिक रोप स्कीपिंग स्पर्धेत प्राविण्य मिळवत जागतिक क्रमवारीत भारताचा झेंडा रोवला आहे
सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठात शिक्षक निवासात राहणाऱ्या दोघा भावंडांनी अमेरिका येथील होस्टन येथे पार पडलेली ए. ए. यु. ज्युनिअर ओलंपिक रोप स्किपिंग स्पर्धा गाजवली. संगणक शास्त्र विभागात कार्यरत असलेले प्रा. नितीन पाटील यांची दोघं मुलं भार्गव तसेच शिवम या दोघांची निवड भारतीय चमूत झाली होती. कोरोनामुळे ही स्पर्धा मागच्या वर्षी स्थगित करण्यात आली म्हणून यावर्षी सदरची स्पर्धा ही आभासी तसेच प्रत्यक्षपणे घेण्यात आली.
भार्गवने चार प्रकारात तर शिवम तीन प्रकारच्या स्पर्धामध्ये भाग घेतला. यात भार्गवने १८ वर्षावरील आणि शिवमने १२ ते १४ या वयोगटात प्रतिनिधित्व केले. दोघांचे या जागतिक स्पर्धेतील प्रदर्शन बघता भार्गवला चौथा रँक तर शिवमला पाचवा रँक बहाल करण्यात आला.
या स्पर्धेत पहिल्या पाच विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार होते. पहिल्या तिघांना सुवर्ण, रौप्य व कांस्य तर चौथ्या व पाचव्या क्रमांकाच्या खेळाडूस रिबन असं स्वरूप होतं. भार्गवला या स्पर्धेत वैयक्तिक एक सुवर्ण, एक रौप्य व दोन रिबन प्रदान करण्यात आल्या. तर शिवमने एक रिबन पटकावले. ही दोघे भावंडे सन – २०१५ पासून रोप स्कीपिंग या खेळात केंद्रीय विद्यालय गणेशखिंड या विद्यालयाचे प्रतिनिधित्व करत होते.
भार्गवने आतापर्यंत राज्यस्तरीय तसेच देशांतर्गत स्पर्धांमध्ये ३१ सुवर्ण २७ रौप्य व पाच कास्यपदक मिळवलेली आहे. तसेच शिवमला १३ सुवर्ण व एक रौप्य पदक मिळाले होते भार्गवने सन – २०१९ मध्ये बँकॉक येथे पार पडलेल्या एशियन रोप स्किपिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. सदर स्पर्धेत भार्गवला एक सुवर्ण व चार कांस्य पदक मिळवलेले होते. भार्गव व शिवम ने मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे परिसरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.