जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त देशभर “Sardar@150 Unity March” या राष्ट्रव्यापी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमाचा एक भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील जळगाव व भुसावळ या दोन्ही शहरांत एकात्मतेचा संदेश देणाऱ्या दोन भव्य पदयात्रांचे आयोजन ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. युवक कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या MY Bharat या उपक्रमाद्वारे या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील पदयात्रा सकाळी ८ वाजता महानगरपालिका येथील सरदार पटेल पुतळ्यापासून प्रारंभ होऊन सरदार वल्लभभाई हॉल येथे समाप्त होईल. तर भुसावळ शहरातील पदयात्रा दुपारी ३.३० वाजता गांधी पुतळा मैदान येथून सुरू होऊन सरदार पटेल पुतळ्याजवळ समारोप होईल. या दोन्ही ठिकाणी शहरातील नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि विविध शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

या पदयात्रेत राज्यातील मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी तसेच युवक मंडळांचे पदाधिकारी सहभागी होणार असून, एकता, देशप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी विशेष प्रयत्न होणार आहेत. देशभर साजरा होणाऱ्या या उपक्रमाद्वारे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चा संदेश दृढ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पदयात्रेसोबत विविध जनजागृती उपक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. यात निबंध व वादविवाद स्पर्धा, व्याख्याने, स्वदेशी मेळावे, नशामुक्ती अभियान, तसेच स्वच्छता उपक्रमांचा समावेश आहे. विद्यार्थी व युवकांना यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी नागरिकांना MY Bharat पोर्टल https://mybharat.gov.in/pages/unity_march या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या राष्ट्रव्यापी एकात्मता यात्रेमुळे युवकांमध्ये देशभक्तीची भावना दृढ होईल, तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजात ऐक्य आणि प्रगतीचा संदेश प्रसारित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



