अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथे संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संविधान गौरव तिरंगा संकल्प मेळावा मोठ्या उत्साहात आणि जोशात पार पडला. ऑल इंडिया संविधान आर्मी व इतर सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने साजऱ्या झालेल्या या मेळाव्यात देशभरात संविधानविरोधी प्रवृत्तींच्या विरोधात निर्णायक पाऊल उचलण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी संविधानाचे रक्षण करण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दादरसह जळगाव जिल्ह्यातील ११ रेल्वे स्थानकांवर एकाचवेळी ‘संविधान आक्रोश तिरंगा रेल्वे रोको आंदोलन’ करण्याची घोषणा करण्यात आली.
आज, दिनांक १३ जुलै २०२५ रोजी, साने गुरुजी विद्यालय, धुळे रोड, अमळनेर येथे संविधान गौरव तिरंगा रॅली व त्यानंतर संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. संविधानाच्या ७५ वर्षांची पूर्ती साजरी करत संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी खान्देशातील आंदोलक, कामगार नेते, व संविधान बचाव चळवळीचे प्रणेते, ऑल इंडिया संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. जगन भाऊ सोनवणे यांनी एल्गार पुकारला. त्यांनी १५ ऑगस्ट रोजी दादर व जळगाव जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांवर तिरंगा घेऊन रेल्वे रोको आंदोलन उभारण्याची अधिकृत घोषणा केली.

या कार्यक्रमाला शिवश्री अशोक दादा पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी संविधानाविषयी जागृती करण्याचे महत्व अधोरेखित केले. मेळाव्यात विविध तालुक्यांतील संविधानवादी, आरक्षण समर्थक व आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष सुभाष दादा आगळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनंदाताई पानपाटील, शहराध्यक्ष अनिल रायसिंग, युवा तालुकाध्यक्ष रवींद्र वानखेडे, ग्रामीण तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, वकील आघाडी जिल्हाध्यक्ष अॅड. शिवकुमार ससाने यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले. सूत्रसंचालन अॅड. ससाने तर आभार प्रदर्शन सुनंदाताईंनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवछत्रपती यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कामगार नेते अॅड. जगन सोनवणे आणि माजी पंचायत समिती सदस्य पुष्पाताई सोनवणे यांचा तिरंगा व संविधान देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनी सामूहिकरीत्या संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
या मेळाव्यात सर्व संघटनांनी १५ ऑगस्ट रोजीच्या आंदोलनासाठी पुढील प्रमुख मागण्या मांडल्या: दादर चैत्यभूमीचे नामांतर, रेल्वे आणि वीज कंपन्यांचे खाजगीकरण थांबवणे, ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरची पुनर्स्थापना, जन सुरक्षा विधेयक रद्द करणे, भुसावळच्या संविधान भवनाची मालकी ९९ वर्षांसाठी समितीकडे सोपवणे, संविधान विरोधकांना फाशीची शिक्षा व संविधानद्रोही कृतींना थांबवणे, तसेच बेरोजगारांना रोजगार देणे. या सर्व मागण्यांसाठी एकाचवेळी रेल्वे स्थानके कॅप्चर करून तिरंगा रोको आंदोलन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.



