यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे यावल-रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविद्यालयांमध्ये ‘महाविद्यालय तेथे शाखा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. हा उपक्रम राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रविंद्र नाना पाटील यांच्या हस्ते भुसावळ येथील पक्ष कार्यालयात अनावरण करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आणि माजी जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष राकेश सोनार, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ सोनवणे, राष्ट्रवादी युवक भुसावळ तालुकाध्यक्ष अतुलजी चव्हाण, राष्ट्रवादी विद्यार्थी भुसावळ तालुकाध्यक्ष अमनजी घोडेस्वार, युवानेते अँड. देवकांतभाऊ पाटील, विनोद दादा पाटील, तसेच भुसावळ येथील सहकारी मित्र लालाभाई आदी मान्यवर उपस्थित होते.
‘महाविद्यालय तेथे शाखा’ या उपक्रमांतर्गत यावल-रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक महाविद्यालयात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची शाखा स्थापन केली जाणार आहे. या शाखांद्वारे विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न होणार असून, त्यांना आवश्यक मदत आणि मार्गदर्शन पुरविले जाईल. या उपक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, तसेच इतर वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन लाभत आहे.