Home Uncategorized रावेरात राष्ट्रवादी (अजित पवार)ची मोठी चाल! नगराध्यक्षसह १६ जागांवर लढणार!

रावेरात राष्ट्रवादी (अजित पवार)ची मोठी चाल! नगराध्यक्षसह १६ जागांवर लढणार!

0
162

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मोठी रणनीती आखली आहे. नगराध्यक्षपदासह एकूण सोळा जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय पक्षाने घेतला असून, या निर्णयामुळे रावेरच्या स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोणत्या समाजघटकातून असेल — माळी, मराठा की मुस्लिम — याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रावेर शहरातील राजकीय वातावरण सध्या तापलेले असताना आज झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत राष्ट्रवादी (अजित पवार गट)ने आगामी निवडणुकीसाठी आपली भूमिका स्पष्ट केली. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून, सोळा प्रभागांमध्ये स्वतंत्र उमेदवार उभे करण्याबाबत एकमत झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आता रावेरच्या राजकारणात पूर्ण ताकदीने उतरला असून, सत्तेच्या समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

या बैठकीला प्रदेश प्रवक्त्या प्रतिभा शिंदे, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, जिल्हा सचिव विवेक ठाकरे, भगतसिंग पाटील, राजेश वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, सादिक मेंबर, कलिम मेंबर, गोपाळ बिरपन, योगेश गजरे, पिंटू वाघ आदींनी राष्ट्रवादी (अजित पवार गट)मध्ये प्रवेश करून पक्षाला नवी ऊर्जा दिली.

बैठकीत नेत्यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादी पक्ष या वेळी कोणत्याही आघाडीत न जाता स्वतंत्रपणे मैदानात उतरणार आहे. रावेर शहराच्या विकासासाठी मजबूत आणि पारदर्शक नेतृत्व उभे करण्याचा निर्धार पक्षाने केला असून, मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवण्यासाठी पुढील काही दिवसांत प्रचाराची प्रभावी मोहीम सुरू करण्यात येणार आहे.


Protected Content

Play sound