नवी दिल्ली | नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी दर वर्षी १६ जानेवारी रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिन साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
आज पंतप्रधान मोदींनी स्टार्टअप उद्योजकांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी ही घोषणा केली. मोदी यांनी आज देशातील १५० स्टार्टअप्स उद्योजकांसोबत संवाद साधला. यामध्ये कृषी, आरोग्य, उद्योजक, अवकाश, उद्योग ४.०, सुरक्षा, तंत्रज्ञान आधारित आर्थिक सेवा, पर्यावरण इत्यादींसह विविध क्षेत्रातील स्टार्टअप्स या संवादात सहभागी झाले होते. या स्टार्टअप्सची सहा कार्यकारी गटांमध्ये विभागणी केली गेली होती. स्टार्टअप्स देशात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राष्ट्रीय गरजांमध्ये कसे योगदान देऊ शकतात हे समजून घेणे हा या संवादाचा उद्देश होती.
याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत सध्या ४६ व्या क्रमांकावर आहे. सरकारचे वेगवेगळे विभाग, मंत्रालये ही तरुण आणि स्टार्टअप्सच्या संपर्कात राहतात. त्यांच्या कल्पनांना प्रोत्साहन देण्याचे काम करतात. तसेच अधिकाधिक तरुणांना नवनिर्मितीची संधी देणे हे सरकारचे प्राधान्य आहे. नावीन्यपूर्णतेबाबत भारतात सुरू असलेल्या मोहिमेचा परिणाम चांगला परिणाम झाला आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स क्रमवारीत भारताच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. २०१५ मध्ये भारत या क्रमवारीत ८१ व्या क्रमांकावर होता. आता इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत हा ४६ व्या क्रमांकावर असल्याचे पंतप्रधान म्हणाले.