युपीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; योगींचा मतदारसंघही ठरला

लखनऊ वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा देखील समावेश आहे.

उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आता भाजपाकडून ही पहिली यादी यादी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार यांची सर्वांनाच उत्सुकता होती. शिवाय, योगी हे यंदा अयोध्या किंवा मथुरा मधून निवडणूक लढवतील अशी जोरदार चर्चा देखील सुरू होती.  भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत मुख्यमंत्री योगींचा मतदारसंघही निश्चत झालेला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर, मथुरा मतदारसंघातून भाजपाने विद्यमान ऊर्जामंत्री श्रीकांत शर्मा यांना तिकीट दिले आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य प्रयागराजच्या सिरथू मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपाने पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील विधानसभा जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.

यादी जाहीर करताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, १०७ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. ६३ विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. २१ नवीन उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले असून यामध्ये तरुण, महिला आणि समाजात चांगले काम करणार्‍या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.

Protected Content