जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाद्वारे रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे, वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि सुरक्षित प्रवासाची सवय रुजवणे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एकत्रितपणे रस्ता सुरक्षा शपथ घेतली. ट्रॅफिकचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याचे व स्वतःसह इतरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारण्याचे वचन देण्यात आले. या वेळी प्राचार्यांनी अध्यक्षीय भाषणात रस्ते अपघातांमुळे होणारे नुकसान अधोरेखित करत नियमांचे पालन ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून सामाजिक बांधिलकी असल्याचे नमूद केले.

विद्यार्थी पार्थ पवार आणि यश पाटील यांनी रस्ता सुरक्षिततेबाबत आपले मनोगत व्यक्त करत तरुणांनी बेफिकीर वाहनचालना टाळून जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले. विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. आर. डी. चौधरी यांनी स्पष्ट निर्देश देत हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांना महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश न देण्याच्या सूचना निगराणी व पहारेकरी कर्मचाऱ्यांना दिल्या. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत अधिक गांभीर्य निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रीती दातीर यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा नियमांची माहिती देत त्यांची अंमलबजावणी का आवश्यक आहे, याचे सविस्तर मार्गदर्शन केले. अपघात टाळण्यासाठी वेगमर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन, सीटबेल्ट व हेल्मेटचा वापर यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रस्ता सुरक्षा जनजागृतीला सकारात्मक प्रतिसाद दिला.



