अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशातील शेतीसमोरील वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भूमी सुपोषण व संवर्धन या राष्ट्रव्यापी अभियानाचा भव्य शुभारंभ गुरुवार, दि. 19 मार्च रोजी अमळनेर येथे होणार असून या कार्यक्रमाला केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मंगळग्रह मंदिर येथे दुपारी 2 वाजता या अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. देशातील शेतजमिनीची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली असून रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिरेकामुळे जमीन नापिक व विषारी बनत असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी व पर्यावरण क्षेत्रातील विविध सामाजिक व धार्मिक संस्थांनी एकत्र येत 2021 पासून या अभियानाची सुरुवात केली होती.

गेल्या पाच वर्षांत देशभरातील सुमारे 30 हजार गावे व 54 हजार शहरी भागांमध्ये भूमिपूजन व जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले असून या उपक्रमाला व्यापक प्रतिसाद मिळाला आहे. याच अभियानाचा राष्ट्रीय स्तरावर शुभारंभ गुढीपाडव्याच्या मंगल मुहूर्तावर म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला अमळनेर येथे होत आहे. 19 मार्च 2026 ते अक्षयतृतीया (19 एप्रिल 2026) या कालावधीत देशभरात विविध उपक्रमांद्वारे हे अभियान राबविले जाणार आहे.
या अभियानांतर्गत भूमिपूजन, सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान, प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा, जनजागृती उपक्रम व प्रदर्शने आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच शहरी भागात कचरा व्यवस्थापनावर भर देत जैविक व अजैविक कचरा वेगळा करणे आणि जैविक कचऱ्यापासून खत निर्मिती यासारख्या उपक्रमांद्वारे पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रसार केला जाणार आहे. देशातील सर्व कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, हजारो गोशाळा व स्वयंसेवी संस्था या अभियानात सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रोटरी क्लब, लायन्स क्लब, निरंकारी परिवार तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी सक्रियपणे कार्यरत आहेत. या अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम वृद्धिंगत करण्यासोबतच कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट आयोजकांनी व्यक्त केले आहे.
या शुभारंभ सोहळ्यास कन्हेरी आश्रमाचे प. पू. आदित्य काडसिद्धेश्वर महास्वामी, संतश्री सखाराम महाराज वाडी संस्थानचे प्रसाद महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भागैयाजी, अक्षय कृषी परिवाराचे अध्यक्ष मनोजभाई सोलंकी, उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे, पद्मश्री सुभाष शर्मा, नवलजी रघुवंशी, आलोकजी गुप्ता, डॉ. बेरिंदम गुणाकरजी, डॉ. दिनेशजी, सुनीलजी घनवट यांच्यासह राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिलदादा पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



