
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलणाऱ्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समाजावर होणारा परिणाम, त्यातून निर्माण होणाऱ्या संधी आणि आव्हानांचा सखोल वेध घेण्यासाठी जळगावातील मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त) येथे आयोजित करण्यात आलेली ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि समाज : सामाजिक-आर्थिक, शैक्षणिक आणि नैतिक परिवर्तनांचा वेध’ या विषयावरील एकदिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद मोठ्या उत्साहात पार पडली.

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालयात दि. ७ मार्च २०२६ रोजी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद (ICSSR), पश्चिम प्रादेशिक केंद्र, मुंबई यांच्या सौजन्याने आयोजित या परिषदेत राज्यासह देशातील विविध भागांतील संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. आधुनिक तंत्रज्ञानाचा समाजाच्या विविध क्षेत्रांवर होणारा प्रभाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा अभ्यास या परिषदेत करण्यात आला.
परिषदेचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या हस्ते झाले. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रभावावर प्रकाश टाकत भविष्यातील सामाजिक आणि आर्थिक आव्हानांवर विचार मांडला. एआयमुळे शिक्षण, उद्योग, आरोग्य आणि प्रशासन या क्षेत्रांत मोठे बदल घडत असून या बदलांचा सकारात्मक उपयोग समाजाच्या विकासासाठी कसा करता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के.सी.ई. सोसायटीच्या शैक्षणिक संचालिका प्रा. मृणालिनी फडणवीस होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षण क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर करताना नैतिक मूल्ये आणि मानवी संवेदनशीलता जपणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. तंत्रज्ञानाचा वापर प्रगतीसाठी असला तरी त्याचा समाजावर होणारा परिणाम लक्षात घेऊन संतुलित दृष्टिकोन ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
परिषदेचे बीजभाषण केरळ येथील महात्मा गांधी कॉलेजचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. विनोद ए. एस. यांनी केले. त्यांनी एआयमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत होत असलेल्या बदलांचे सखोल विश्लेषण मांडत नव्या रोजगार संधी आणि कौशल्यांच्या गरजेवर भर दिला. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे पारंपरिक रोजगार संरचनेत बदल होत असले तरी नव्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
परिषदेदरम्यान विविध शैक्षणिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रांमध्ये संशोधक आणि प्राध्यापकांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि नैतिक पैलूंवर आधारित शोधनिबंधांचे सादरीकरण केले. विविध विषयांवर झालेल्या चर्चांमधून एआय तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात संशोधन आणि धोरणात्मक दृष्टिकोन विकसित करण्यावर भर देण्यात आला.
या राष्ट्रीय परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक डॉ. सुरेखा पी. पाल्वे आणि आयोजक सचिव डॉ. गायत्री डी. खडके यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनीही परिषद यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहकार्य केले.



