Home क्रीडा जैन हिल्समध्ये राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्य स्पर्धेचे आयोजन; खेळाडूंना मिळणार ८ लाखांची बक्षिसे...

जैन हिल्समध्ये राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्य स्पर्धेचे आयोजन; खेळाडूंना मिळणार ८ लाखांची बक्षिसे !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथे २ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान ३८व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा जैन हिल्स परिसरातील आकाश ग्राऊंडमध्ये पार पडणार आहे. जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड या आंतरराष्ट्रीय कंपनीने या स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. देशभरातील ५०० हून अधिक खेळाडूंनी, ज्यात विशेषतः ४०० फिडे मानांकन प्राप्त खेळाडूंचा समावेश आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य बुध्दिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन यांनी दिली आहे.

स्पर्धेचे स्वरूप आणि नियम:
जळगाव जिल्ह्यातील निसर्गरम्य जैन हिल्स परिसरातील भव्य दिव्य अनुभूती मंडपात ही स्पर्धा खेळवली जाईल. ही बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा एकूण ११ फेऱ्यांमध्ये होईल आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (FIDE) आखलेल्या नियमावलीनुसार पार पडेल. कोलकता येथील आंतरराष्ट्रीय पंच श्री. देवाशीष बरुआ हे मुख्य पंचांची भूमिका निभावतील, तर जळगावचे आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे हे सहाय्यक पंच असतील. गुजरातचे प्रशांत रावल यांच्यासह अन्य १४ पंच या स्पर्धेचे संचलन करतील. ही स्पर्धा मुले आणि मुली अशा स्वतंत्र वयोगटात आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक डावासाठी बुद्धिबळ घड्याळांचा वापर अनिवार्य असून, प्रत्येकी ९० मिनिटे आणि प्रत्येक चालीसाठी ३० सेकंदांची वाढीव वेळ निर्धारित करण्यात आली आहे.

पारितोषिके आणि संधी:
या बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी एकूण ८ लाखांची रोख पारितोषिके तसेच आकर्षक चषक दिले जाणार आहेत. ही स्पर्धा जरी ११ वर्षांखालील वयोगटातील मानांकन स्पर्धा असली, तरी स्पर्धेतील विजेते खेळाडू आशियाई आणि जागतिक स्पर्धांसाठी पात्र ठरतात. अशा स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग पाहता, नवोदित खेळाडूंना देखील आंतरराष्ट्रीय मानांकन (FIDE Rating) प्राप्त करण्याची सुवर्णसंधी मिळते. क्लासिकल प्रकारातील आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणे हे बहुतांश बुद्धिबळ खेळाडूंचे स्वप्न असते. कमी वयातच जर हे मानांकन प्राप्त झाले, तर खेळाडूंना भविष्यात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवणे, बुद्धिबळातील स्पर्धात्मक वाटचाल सुकर होणे, याबरोबरच बुद्धिबळ क्षेत्रात संधीची नवनवीन दालने पादाक्रांत करण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने प्राप्त होणार आहे.

देशभरातील खेळाडूंचा सहभाग आणि आकर्षण:
या स्पर्धेत अंदमान निकोबार, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, चंदीगड, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, पंजाब, राजस्थान अशा विविध राज्यातील खेळाडूंशी आपला खेळ आजमावण्याची संधी यातून मिळेल. या राष्ट्रीय स्पर्धेद्वारा आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करण्याची संधीसुद्धा या स्पर्धकांना मिळणार आहे. महाराष्ट्रातील ७, ९ व ११ वर्षांतील वयोगटातील तसेच स्थानिक गुणवान खेळाडूंना मानांकन प्राप्त करण्याची संधी मिळेल.

या स्पर्धेची उल्लेखनीय बाब म्हणजे, ५५० नोंदणीकृत खेळाडूंमध्ये जवळपास ४०० खेळाडूंना फिडे मानांकन प्राप्त आहे. त्यात प्रथम मानांकित पुण्याचा अद्विक अग्रवाल (२२५१), मुलींमध्ये केरळची देवी बीजेस (१८६९) यांच्यासह अनेक खेळाडू हे आशियाई व जागतिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेले आहेत. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे, पहिले प्रत्येकी सर्वोच्च सहा सामने डिजिटल बोर्डवर लाईव्ह खेळले जातील. तसेच, चेसबेस (ChessBase) द्वारे स्पर्धेचे सामने त्यांच्या ॲपद्वारे लाईव्ह पाहण्यास मिळणार आहेत.

स्पर्धेचे वैशिष्ट्य आणि आयोजकांचे मत:
या स्पर्धेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, सर्व सहभागी खेळाडूंना त्यांच्या प्रत्येक डावातील निकालानुसार विजयी, उपविजयी व बरोबरीत असलेल्या खेळाडूंना विशेष मूल्यांकनानुसार रोख रकमेचे पारितोषिक जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडतर्फे दिले जाणार आहे. प्रत्येक स्पर्धकांच्या उत्कृष्ट खेळासाठी प्रोत्साहेतू पुरस्कृत करणारी भारतातील ही एकमेव बुद्धिबळ स्पर्धा असेल, असे मत या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष अतुल जैन यांनी याप्रसंगी मांडले.

मार्गदर्शन आणि सहकार्य:
सदर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे चेअरमन श्री. अशोक जैन यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे. तसेच महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुख शेख, उपाध्यक्षा अंजली कुलकर्णी, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, खजिनदार अरविंद देशपांडे, सहसचिव शकील देशपांडे व संजय पाटील, सदस्य सर्वश्री चंद्रशेखर देशमुख, तेजस तायडे, पद्माकर करणकर, नरेंद्र पाटील, रवींद्र धर्माधिकारी, प्रवीण ठाकरे, रवींद्र दशपुत्रे, डॉ. तुषार उपाध्ये व सल्लागार सदस्य आर. के. पाटील, विवेक दाणी, यशवंत देसले, तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमी व जैन इरिगेशन सिस्टिम्स कंपनीचे सर्व सहकारी यांचे सहकार्य लाभत आहे.


Protected Content

Play sound