
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जैन हिल्सच्या अनुभूती मंडपम येथे सुरू असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत सातव्या फेरीपर्यंत सामने अत्यंत अटितटीचे झाले आहेत. मुलांच्या गटात दिल्लीचा अरिहत कपिल याने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट कामगिरी करत सातपैकी सात सामने जिंकून अव्वल स्थानावर आघाडी घेतली आहे. अरिहतने महाराष्ट्राच्या अविरत चौहानला धक्कादायकपणे हरवून एकल बढत मिळवली. दुसऱ्या पटावर तेलंगणाचा इशान कंदी आणि पश्चिम बंगालचा नरेंद्र अग्रवाल यांच्यातील सामना बरोबरीत सुटला, तर महाराष्ट्राचा अद्वित अग्रवाल आणि ओणीक्षूक मंडल यांच्यातील सामनाही बरोबरीत संपला.

मुलींच्या गटात सात खेळाडूंची आघाडी
३९२ मुले आणि १७७ मुलींचा समावेश असलेल्या या स्पर्धेतील मुलींच्या गटातही जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळत आहे. पहिल्या पटावर केरळच्या दिवी बिजेस आणि जानकी एस.डी. यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. झारखंडची दिशीता डे आणि त्रिपुराची आरध्या दास यांच्यातही बरोबरीत सामना झाला. महाराष्ट्राची क्रिषा जैन आणि भूमिका बांधले यांच्यातील तिसऱ्या पटावरील सामन्यात क्रिषा जैनने बाजी मारली. तेलंगणाची सुमिता पुनगावनने गुजरातच्या मान्या ड्रोलियाला नमवून आपले वर्चस्व कायम ठेवले, तर महाराष्ट्राची प्रिशा घोलप हिने कर्नाटकाच्या नक्षत्रा गोमूदवेली हिला हरवले. मुलींच्या गटात सध्या सहा गुणांसह सात खेळाडू आघाडीवर आहेत, ज्यामुळे अंतिम फेरीपर्यंत स्पर्धा अधिक रोमांचक होण्याची शक्यता आहे.
खेळाचा आनंद घ्या, १०० टक्के योगदान द्या – निशा अनिल जैन
आजच्या सकाळच्या सत्रात अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा अनिल जैन यांनी खेळाडूंशी संवाद साधला. “तुम्ही विविध ठिकाणांवरून इथे आला आहात. खेळताना विजय आणि पराभवाचा विचार करू नका, तर खेळाचा पुरेपूर आनंद घ्या. फक्त खेळताना आपले शंभर टक्के योगदान द्या,” असा सल्ला त्यांनी दिला. यानंतर त्यांनी पालकांशी स्पर्धेतील व्यवस्थेविषयी चर्चा केली. पालकांनी जैन हिल्सच्या निसर्गरम्य परिसराचे कौतुक करत स्पर्धेतील व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले. पालकांनी अनुभूती स्कूललाही भेट दिली.
बुद्धिबळ बौद्धिक एकाग्रतेसाठी महत्त्वाचे – ऐश्वर्या रेड्डी
दुपारचे सत्र ऐश्वर्या रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू करण्यात आले. यावेळी त्यांनी बौद्धिक एकाग्रता वाढवण्यासाठी बुद्धिबळ हा खेळ खूप मोलाचा असल्याचे सांगितले. या प्रसंगी जैन इरिगेशनचे मीडिया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, नाशिकचे वरिष्ठ प्रशिक्षक सुनील शर्मा, पंच दीपक चौहान आणि पुण्याच्या जुईली कुलकर्णी हे उपस्थित होते.



