मुंबई । केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी किसान संघर्ष समितीने भारत बंद पुकारला असून याला काँग्रेससह अन्य पक्ष व संघटनांनी पाठींबा दिला आहे. आज सकाळपासून देशभरात ठिकठिकाणी निदर्शने सुरू झाली आहेत.
नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने संसदेत कृषी विधेयके मंजूर केली असली तरीही त्यातून शेतकरी हित साधले जाणार नाही, अशी भूमिका घेत अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने आज भारत बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये देशभरातील विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्ष आणि शेतकरी सहभागी झाले आहेत. दरम्यान, या बंदच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील किसान मजदूर संघर्ष समिती आक्रमक झाली असून आज सकाळपासून अमृतसरमध्ये रेल रोको आंदोलन सुरु केले आहे. यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. हे आंदोलन चिघळण्याचे संकेत आता मिळाले आहेत.
केंद्राने बहुमताच्या जोरावर शेतकर्यांना हमीभाव नाकारले आहे. तसेच बाजार समित्यांचे अस्तित्व पुसत शेतकर्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधणारी प्रक्रिया पुढे रेटण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्राची ही भूमिका शेती, माती व शेतकर्यांशी द्रोह करणारी आहे. केंद्र सरकारच्या या कृतीचा किसान सभेच्यावतीने धिक्कार असून शेतकरी संघटनांच्या देशव्यापी मंच असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने या विधेयकांविरोधात आज देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे, असे अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सांगितले. यानुसार आज सकाळपासून ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत.
दरम्यान, आजच्या बंदला काँग्रेस पक्षाने पाठींबा दिला असून यात सक्रीय सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनेही शेतकरी संघटनांच्या भारत बंदला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.