जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असणार्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना आमदार एकनाथराव खडसे यांनी एक सल्ला दिला आहे.
नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्याने त्या नाराज झाल्या आहेत. त्यांनी याबाबत थेट भाष्य केले नसले तरी वक्तव्यातून त्यांची नाराजी लपून राहिलेली नसल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमिवर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा मुंडे कुटुंबियांचे निकटवर्तीय असणारे आमदार एकनाथराव खडसे यांनी याबाबत भाष्य केले आहे.
या संदर्भात नाथाभाऊ म्हणाले की, मंत्रीमंडळ विस्तार अपूर्ण दिसत आहे. पुढील काळात तो पूर्ण होईल अशी आशा आहे. पण अलीकडच्या काळात गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबाशी संबंधित आहेत, त्यांच्यावर सातत्याने अन्याय केल्याचं दिसत आहे. यामध्ये पंकजा मुंडेही आहेत. आताही पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान मिळेल की नाही याबाबत शंका आहे. पंकजा मुंडेंनी आता वाट न पाहता वरिष्ठांना भेटावे असा सल्ला खडसे यांनी त्यांना दिला आहे.
दरम्यान, शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या सर्व जणांना मंत्री बनविण्यात यावे अशी खोचक मागणी देखील आ. एकनाथराव खडसे यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.