नशिराबाद लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. गोदावरी हॉस्पिटलसमोरील उड्डाणपुलावर ३१ डिसेंबर रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून वाळूने भरलेला डंपर पकडला असून, याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबर रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास नशिराबाद पोलिसांना अवैध वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गोदावरी हॉस्पिटल समोरील उड्डाणपुलावर सार्वजनिक जागेत पोलिसांनी नाकाबंदी केली असता, संशयास्पद अशोक लेलँड कंपनीचा डंपर (क्रमांक MP-48 H-0583) येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यात गिरणा नदीपात्रातून (खेडी आव्हाणे येथून) बेकायदेशीररीत्या भरलेली अडीच ब्रास वाळू मिळून आली.

पोलिसांनी वाहन चालक पवन सुपडू पाथरवट (वय २६, रा. साकेगाव, ता. भुसावळ) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा डंपर आणि १० हजार रुपये किमतीची अडीच ब्रास वाळू असा एकूण ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.



