जळगाव प्रतिनिधी । भर दिवसा गॅस कटरने कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वाहनांचे स्पेअर पार्ट वेगळे करून तब्बल २७ लाख रूपयांची चोरी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
वाघूल कालव्याची पाटचारी तयार करण्याचे काम सोनाई कन्स्ट्रक्शनला मिळाले असून या कंपनीने बेळी गावाजवळ तीन डंपर व रोलरसह साहित्य ठेवले आहे. लॉकडाऊनच्या काळात काम बंद असल्याचा फायदा उचलत २२ मार्च ते २४ डिसेंबर २०२० दरम्यान कंपनीच्या मालकीचे २ लाख रुपये किमतीचे रोलर, साडेसात लाख रुपये किमतीचे पेव्हर मशीन, ३ लाखांचे सेंट्रिंग सामान, १ लाखांचे स्क्रॅप, २ लाखांचे स्टील शिट व १२ लाख रुपये किमतीचे तीन डंपर असा एकूण २७ लाख ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी वेळोवेळी चोरून नेला.
हा सर्व प्रकार अगदी दिवसा सुरू होता. हा प्रकार सुरू असताना परिसरातील काही जणांनी त्यांना हटकले असता आम्ही फायनान्स कंपनीचे कर्मचारी आहेत, कामात अडथळा आणला तर गुन्हा दाखल करू असे संबंधीत सांगत होते. दरम्यान, अलीकडेच सोनाई कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापक रोशन कुमार पाठक (वय ३५, रा. औरंगाबाद) यांनी जळगावात येऊन पाहणी करून त्यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या तपासात अट्टल गुन्हेगार यासीन मुलतानी याच्या गँगने हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी तपासचक्रे फिरवून भूषण हर्षल महाजन (वय ३७, रा. जळगाव) याला ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला ५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे तपास करीत आहेत.