मुंबई प्रतिनिधी । नाशिकमधील दोन मातब्बर नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले असून ते आज सायंकाळी मातोश्रीवर शिवबंधन बांधणार आहेत.
अलीकडेच नाशिकमधील मोठे राजकारणी समजले जाणारे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे झालेले डॅमेज कंट्रोल करण्याची तयारी शिवसेनेने केल्याचे स्पष्ट झाले आहे. या अनुषंगाने भाजपचे दोन बडे नेते वसंत गीते आणि सुनील बागुल आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या दोन्ही नेत्यांनी काल शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. आज संध्याकाळी 6 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेनाप्रवेश होईल. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजेच मातोश्रीवर हा प्रवेशसोहळा होईल.
नाशिक महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ही पोकळी भरुन काढण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु होते. त्यानंतर आता नाशिक भाजपचे दोन बडे नेते वसंत गीते आणि सुनील बागुल हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत आणखी काही नगरसेवकसुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.