Home Uncategorized नाशिक ज्योतिषी प्रकरण; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांचे निर्देश?

नाशिक ज्योतिषी प्रकरण; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांचे निर्देश?


मुंबई -वृत्तसेवा ।  नाशिकमधील ज्योतिषी अशोक खरात याला एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर खरातचे विविध कारनामे उघडकीस येत असून, त्याच्याशी संबंधित काही व्हिडिओ आणि फोटो समोर आल्याने राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातसोबतचे काही फोटो तसेच त्याची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओनंतर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विविध स्तरातून जोर धरू लागली आहे.

दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या वादग्रस्त प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री स्तरावरूनही हालचाली सुरू झाल्या आहेत. रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे निर्देश देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

अशोक खरातविरोधातील गुन्ह्यामुळे आधीच संतापाची लाट उसळलेली असताना, त्याच्याशी संबंधित व्यक्तींच्या नात्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. तपास यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. राजकीय आणि सामाजिक पातळीवर या घटनेचे पडसाद उमटत असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound