वॉशिंग्टन वृत्तसंस्था । ‘नासा’ या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने ‘चांद्रयान-२’ मोहिमेतील विक्रम लँडरची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. ‘विक्रम’ लँडर चंद्रावर उतरताना जोरदार आदळल्याचे नासाने छायाचित्रांव्दारे स्पष्ट केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विक्रम लँडरने चंद्रावरील एका सपाट भूमीवर उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र विक्रमचे हे उतरणे अपेक्षेनुसार होऊ शकले नाही. या नंतर ७ सप्टेंबरला विक्रमचा इस्रोशी संबंध तुटला. विक्रम चंद्रावर उतरताना जोराने आदळले हे स्पष्ट झाल्याचे नासाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. विक्रम नेमक्या कोणत्या जागी आदळले हे अजूनही निश्चितपणे सांगता येत नाही. ही छायाचित्रे १५० किमी इतक्या अंतरावरून काढण्यात आली आहे. नासाचे ऑर्बिटर पुन्हा एकदा लँडिंग ठिकाजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नासाने म्हटले आहे. १४ ऑक्टोबर या दिवशी प्रकाशाची स्थिती चांगली असेल आणि याचाच फायदा घेत पुन्हा छायाचित्रे टिपण्याचा प्रयत्न केला असून नासाने प्रसिद्ध केलेली ही हाय रेझॉल्यूशन छायाचित्रे ऑर्बिटरद्वारे खेचलेली आहेत.