नर्मदा परिक्रमाकार डॉ. नि. तु. पाटील यांचा जळगाव आयएमएतर्फे गौरव

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नर्मदा परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण करणारे ख्यातनाम नेत्ररोगतज्ज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. नि. तु. पाटील यांना आज जळगाव आयएमएच्या वतीने हृद्य सत्कार करण्यात आला.

 

आज डॉ. नि. तु. पाटील यांचा  जळगाव आयएमए गणेशोत्सव २०२३ च्या निमित्ताने  नर्मदा माता  परिक्रमा अनुभव कथन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जळगाव आयएमए चे अध्यक्ष डॉ.सुनील नाहाटा ,सचिव डॉ.तुषार बेंडाळे आदी हे उपस्थित होते. परिक्रमवासी डॉ. नितु पाटील यांचा सत्कार आयएमएचे  अध्यक्ष डॉ. नाहाटा  यांच्या हस्ते शाल,नारळ देऊन झाला.तसेच जळगाव नेत्र संघटना मार्फत डॉ. रागिणी पाटील यांच्या हस्ते देखील सत्कार झाला.

 

याप्रसंगी  डॉ. नि. तु. पाटील म्हणाले की मॉं नर्मदा परिक्रमा करत असतांना आपला आचार हा धार्मिक असतो,विचार हे सात्विक असतात आणि मुखात मातेच्याच नामस्मरणाचे उच्चार असतात. त्यामुळे जवळपास तीन हजार ६०९ किलोमीटर पायी चालत असतांना मातेचं नामस्मरण करोडोच्या संख्येने होते.

 

ते पुढे म्हणाले की,  परिक्रमा करत असतांना एका ठिकाणी लहान मुले खेळताना दिसले असता त्यांना चॉकलेट खायला दिली आणि मी पुढे निघालो. सहज मागे वळून पाहिले असता एका मुलाने सर्व चॉकलेट रस्त्यावर फेकून दिले. मी परत आलो आणि माझ्या तोंडातून अचानकपणे शिवी निघाली,मी चॉकलेट जमा केली दुसर्‍या मुलाला दिली आणि निघालो. पण चालतांना फार वाईट वाटले.

 

६६ दिवस आपण शांत होतो, काही कुविचार नाही आणि आता ….हे.मनोमन मातेची आणि त्या मुलाची माफी मागितली.रात्री चालत चालत ते एका फार्म हाऊस वर थांबले. त्याठिकाणी पार्टी सुरू होती,परवानगी घेत गेटसमोर खाट टाकून मी झोपलो.फार्म हाऊस चे मालक पार्टी असल्याने मला रात्रीचे जेवण देण्याचे विसरले. मग मी बिस्कीट खाऊन रात्र काढली. तेव्हा हे अस का झालं याचा विचार केला असता लक्षात आले की दुपारी आपण जी मुलाला शिवी दिली  त्याची ही शिक्षा आहे.तेव्हापासून उच्चार फक्त नामस्मरणासाठी असे विविध अनुभव डॉ नितु पाटील यांनी सांगितले.तसेच आगामी काळात नर्मदा परिक्रमा अनुभवावर एक पुस्तक लिहिण्याचे काम माझे वर्गमित्र सुश्रुत जळूकर यांनी हाती घेतले असून  लवकरच त्याचे प्रकाशन होईल अशी माहिती डॉ. नि. तु. पाटील यांनी याप्रसंगी दिली.

 

यावेळी  जळगाव आयएमए पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. यांनी सूत्रसंचालन डॉ. तुषार बेंडाळे , तर आभार प्रदर्शन डॉ. भरत बोरोले  यांनी केले. कार्यक्रमानंतर महाप्रसाद भांडाराचा कार्यक्रम झाला.

Protected Content