नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाला अखेर रविवारचा मुहूर्त

9958bf8fe589fe8707f0295412e9b254

मुंबई, वृत्तसंस्था | महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांना अखेर भाजप प्रवेशाचा मुहूर्त सापडला आहे. विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनाआधी म्हणजे १ सप्टेंबर रोजी राणे त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलिन करून ते भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपा प्रवेशाच्या या वृत्ताला स्वत: राणेंनीच दुजोरा दिला आहे.

 

बेस्ट संयुक्त कृती समितीने सातवा वेतन आयोग लागू व्हावा म्हणून वडाळा डेपो येथे बेमुदत उपोषण पुकारले आहे. यावेळी कामगार नेते शशांक राव यांची प्रकृती खालावल्याचे कळाल्यानंतर नारायण राणे यांनी उपोषककर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राणे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेला दुजोरा दिला. तुम्ही येत्या १ सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची आज दिवसभर चर्चा आहे. ती खरी आहे का? असा सवाल राणेंना पत्रकारांनी विचारला असता, तुम्ही म्हणताय ते खरं आहे, असे सांगत राणेंनी येत्या रविवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत. येत्या रविवारी राणे भाजपमध्ये प्रवेश करतानाच त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही भाजपमध्ये विलिन करणार असल्याचे सांगण्यात येते. राणेंसोबत त्यांचे चिरंजीव नितेश आणि निलेश राणेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

भाजप स्वबळावर लढणार? :- दरम्यान, शिवसेनेच्या विरोधामुळे आतापर्यंत भाजपने राणेंना पक्षप्रवेश नाकारला होता. मात्र आता भाजपमध्ये इतर पक्षातून येणाऱ्या विद्यमान आमदारांची संख्या वाढल्याने या आमदारांना तिकीट देण्यासाठी भाजपने स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच कोकणातही भाजपची ताकद वाढवण्यासाठी शिवसेनेच्या विरोधानंतरही राणेंना पक्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. राणे आणि इतर आमदारांच्या प्रवेशामुळे भाजप येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची डोकेदुखी वाढवणार असल्याचे संकेतही मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Protected Content