नांदुरा-पुरूषोत्तम भातूरकर | युवकाने एका मुलीस फुस लावून पळवून नेल्याने तालुक्यातील वडनेर भोलजी येथे काल दोन गटात तुफान राडा झाला. यामुळे तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच गावात दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली असून सध्या या गावात तणावपूर्ण शांतता आहे.
नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील विशिष्ट समाजाच्या एका युवकाने गावातीलच एका मुलीला फुस लावून पळवून नेले. या कारणावरून काल सायंकाळी दोन गटात वाद उसळून हाणामारी व दगडफेक सुरु झाली. आमने-सामने आलेल्या दोन गटाने एकमेकांच्या घरावर दगडफेक करत नुकसान केले. तसेच काही संतप्त युवकांनी दुचाकींची तसेच दुकानांची जाळपोळ केली. यामुळे या गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित या गावात दाखल होवून परिस्थिती नियंत्रणात आणली. काल रात्री पासून या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. याप्रकरणी नांदुरा पोस्टेला दोन्ही गटातील ६४ जणांविरुध्द कलम १४३, १४४, १४५, १४७, १४८, १४९, ४३६, ३२४, ३३६, ४२७, १८८, १६० भादंवी सहकलम १३५ मपोका, सहकलम ७ क्रिमीनल लॉ ऍमेडमेंट ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.