जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नंदगाव-फेसर्डी परिसरातील शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करत 33/11 केव्ही क्षमतेच्या वीज उपकेंद्राचे लोकार्पण आज उत्साहात पार पडले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा आणि ग्रामस्थांना २४ तास अखंड वीज उपलब्ध होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र कृषी धोरण 2020 अंतर्गत सुमारे ४ कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या या उपकेंद्राचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचे सांगत, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणे हेच आपले कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी आपल्या आंदोलनाच्या काळातील आठवणींना उजाळा देत वीज व ट्रान्सफॉर्मरच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्धार व्यक्त केला.

या उपकेंद्रामुळे परिसरातील वीज समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार असून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाल्याने शेतीकाम अधिक सुलभ होणार आहे. तसेच ग्रामस्थांना २४ तास वीजपुरवठा मिळणार असल्याने दैनंदिन जीवनमानात सुधारणा होणार आहे. भविष्यात गरज भासल्यास येथे ५ एमव्हीए क्षमतेचा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येईल, अशी ग्वाहीही यावेळी देण्यात आली.
पालकमंत्र्यांनी यावेळी जळगाव व धरणगाव तालुक्यात सुमारे ३२ कोटी रुपयांच्या निधीतून वीज उपकेंद्र, रोहित्रे आणि लाईन सुधारणा सुरू असल्याची माहिती दिली. तसेच परिसरातील सुमारे १५० कोटी रुपयांच्या भोकर पुलाचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगत विकासकामांचा वेग कायम ठेवण्याचे आश्वासन दिले. “पाणी, वीज आणि रस्ता या शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजा असून शासन त्यासाठी सातत्याने कार्यरत आहे,” असे त्यांनी नमूद केले.
याच कार्यक्रमात नंदगाव येथील गावांतर्गत काँक्रिटीकरणासाठी १५ लाख रुपये, पिलखेडा येथील स्मशानभूमी पोहोच रस्ता व काँक्रिटीकरणासाठी ३० लाख रुपये या कामांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच नंदगाव-फेसर्डी-किनोद मार्गाच्या डांबरीकरणासाठी ६० लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. त्यामुळे परिसरातील पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सभापती राजेंद्र चव्हाण यांनी केले, तर प्रास्ताविकात उपकार्यकारी अभियंता विजय कपूरे यांनी वीज उपकेंद्राबाबत सविस्तर माहिती दिली. आभार प्रदर्शन विभाग प्रमुख गजानन सोनवणे यांनी केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



