नागपूरच्या लसूण चोरांचा पर्दाफाश; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसी पोलिसांनी एक मोठी कारवाई करत, नागपूरमधून अपहार झालेल्या ४ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या लसूणाच्या गोण्यांचा जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर केली गेली.

पोलिसांना माहिती मिळाली होती की, जळगावच्या साहित्य नगरमधील सुप्रीम कॉलनीत स्थित एका बंद बेकरीत चोरीच्या लसणाच्या गोण्या साठवून ठेवलेल्या आहेत. यावरून सहा. पो. निरीक्षक गणेश वाघ यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने त्वरित कारवाई सुरू केली.

पथकाने बेकरीची झडती घेतल्यावर, ९७ गोण्या लसणाने भरलेल्या आढळल्या. या लसणाची एकूण किंमत ४ लाख ८५ हजार रुपये असल्याचे तपासणीत उघड झाले. बेकरी मालक ईश्वर प्रकाश राठोड यांना विचारले असता, त्यांना सांगितले की, त्यांचा चुलत भाऊ विनोद गणेश रुढे याने हा माल कुठूनतरी विकत आणला आहे, पण त्याच्याकडे खरेदीचे कोणतेही बिले नाहीत. त्याने फक्त बेकरीमध्ये त्या गोण्यांचा साठा केला होता. यावर संशय व्यक्त करत पोलिसांनी माल जप्त केला आणि विनोद रुढे याच्यावर गुन्हा दाखल केला.

अधिक तपास करतांना, हा माल नागपूरमधील श्याम रमेश मनवाणी यांच्या टाटा ओनियन कंपनीचा असल्याचे स्पष्ट झाले. श्याम मनवाणी यांनी लसूण नागपूरहून बुखारो रांची येथे पाठवण्यासाठी महिंद्रा टेम्पो चालक विनोद रुढे याच्या ताब्यात दिला होता. मात्र, विनोद रुढे याने माल पोहोचवण्याऐवजी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याचा अपहार केला.

एमआयडीसी पोलिसांनी माहिती मिळताच, विकल्या जाण्याच्या आधीच तो माल जप्त करण्यात यश मिळवले. श्याम मनवाणी यांना त्यांचा माल परत मिळाल्याने त्यांनी जळगाव पोलिसांचे आभार व्यक्त केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली.

Protected Content