नागपूर । एकतर्फी प्रेमातून संबंधीत तरूणीची आजी व भावाची क्रूर हत्या करणार्या आरोपीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
हजारीपहाड परिसरातल्या कृष्णनगरमध्ये काल दुपारी धुर्वे कुटुंबातील लक्ष्मीबाई धुर्वे (वय६५) आणि यश धुर्वे (वय१०) यांची एका माथेफिरूने हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. हे खून एकतर्फी प्रेमातून करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. संबंधीत तरूण हा गांधीबाग परिसरात राहणारा होता. अनेक दिवसांपासून धुर्वे कुटुंबातील तरुण मुलीच्या मागे लागला होता. त्यामुळे ना इलाजाने धुर्वे कुटुंबियांनी आपल्या मुलीला नागपुरातच दुसर्या परिसरात राहणार्या मामाच्या घरी पाठवले होते.
गुरूवारी दुपारी धुर्वे दाम्पत्य आपल्या कामावर गेल्यानंतर घरी लक्ष्मीबाई आणि चिमुकला यश हे दोघेच होते. त्याच वेळी तो तरुण त्या ठिकाणी आला आणि त्याने लक्ष्मीबाई आणि यशचा तलवारीने वार करून खून केला. हत्या केल्यानंतर तरुण फरार झाला. त्यानंतर आरोपीने काल रात्री मनकापुर परिसरात रेलवे ट्रॅक वर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. हा आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.