नागपूर वृत्तसंस्था । नागपूर शहराच्या महापौर यांच्या वाहनावर मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात सुदैवाने महापौर संदीप जोशी या हल्ल्यातून वाचले. शिवाय, वाहनामधील कोणालाही दुखापत झाली नाही. जर महापौर सुरक्षित नसेल तर, कायदा व सुव्यवस्था कशाप्रकारे चालेल? असा प्रश्न उपस्थित करून या घटना गांभीर्याने घेतली पाहिजे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
काल ज्याप्रकारे नागपूर शहाराचे महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर गोळीबार झाला, ही अत्यंत गंभीर बाब आहे. जर महापौर सुरक्षित राहणार नसतील, तर कायदा व सुव्यवस्था कशाप्रकारे चालेल? मला वाटतं की याची अत्यंत गांभिर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे. आम्ही सरकारकडे देखील मागणी करणार आहोत की, या घटनेची गंभीर दखल घेऊन अशा प्रकारचे जे आरोपी आहेत, त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे. यासाठी आम्ही निश्चितपणे सरकारवर दबाव देखील आणणार आहोत, अशी फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान महापौरांच्या वाहनावर हल्ला केल्यानंतर दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. महापौर संदीप जोशी यांना १२ दिवसांपासून धमक्या देखील येत होत्या. पोलीस हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत.