Home उद्योग ना. धों. महानोर यांचे साहित्य, शेती आणि पाण्यासाठी बहुमोल योगदान – अशोक...

ना. धों. महानोर यांचे साहित्य, शेती आणि पाण्यासाठी बहुमोल योगदान – अशोक जैन 

0
147

मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । साहित्य, शेती आणि पाणी क्षेत्रात बहुआयामी कार्य करणाऱ्या कविवर्य ना. धों. महानोर यांच्या कार्याचा गौरव करणारा ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार सोहळा मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांनी कविवर्य महानोर यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील भान, साहित्यिक सृजनशीलता आणि समाजप्रबोधनाचे कार्य याचे कौतुक करताना त्यांना ‘अष्टपैलू व्यक्तिमत्त्व’ असे संबोधले.

अशोक जैन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्यासोबत ना. धों. महानोर यांचं शेती आणि साहित्य विषयावरचं चिंतन म्हणजे मेजवानीच असायची. त्यांच्या सहवासात शरद पवार यांच्यासारखा नेता असला की ते जणू दुग्धशर्करा योगच वाटायचा. शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलावे यासाठी महानोरांनी आयुष्यभर प्रयत्न केले. कविता, चित्रपटगीते, लेखन आणि शेतीविषयक विचारांतून त्यांनी कायमच समाजाचा पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न केला.

या पुरस्कार सोहळ्याला माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, खासदार सुप्रिया सुळे, ना. धों. महानोर यांच्या कन्या सरला महानोर-शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. महाराष्ट्राच्या सहा विभागांतील साहित्यिक आणि शेती-पाणी क्षेत्रातील कार्यकर्त्यांना यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

साहित्य क्षेत्रासाठी गीतकार अविनाश पोईनकर (चंद्रपूर), पत्रकार हिना कौसर खान (पुणे), कवी-गीतकार वैभव देशमुख (बुलढाणा), आणि लेखिका सुचिता खल्लाळ (नांदेड) यांना ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर पालघरमधील साधना उमेश वर्तक व नंदुरबारमधील कुसुम सुनील राहसे यांना शेती-पाणी पुरस्कार देण्यात आले. पुरस्कारामध्ये प्रत्येकी ₹२५,००० रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले.

अरुणभाई गुजराथी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, ना. धों. महानोर हे केवळ कवी नव्हते, तर समाज परिवर्तनाचा ध्यास घेणारे एक सच्चे कार्यकर्ते होते. त्यांनी कवितेच्या माध्यमातून समाजाला जागवण्याचं काम केलं आणि आपुलकीच्या नात्यांमधून जनसामान्यांचे प्रश्न मांडले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोगतात म्हटले की, महाराष्ट्र पूरस्थितीत सापडलेला असताना हा कार्यक्रम घेण्याबाबत साशंकता होती, परंतु जर ना. धों. महानोर आज आपल्यात असते, तर त्यांनी ही वेदना किती प्रभावीपणे शब्दबद्ध केली असती याची कल्पनाही करता येत नाही. त्यांच्या कार्याचा वारसा नवकवींनी पुढे न्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे संचालन दत्ता बाळसराफ यांनी केलं. त्यांनी यशवंतराव चव्हाण आणि ना. धों. महानोर यांच्यातील मैत्री आणि विचारसाम्य यांची आठवण करून दिली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी महानोर यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला.


Protected Content

Play sound