जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दरम्यानच्या रस्त्यावर आज, बुधवार ९ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता एका अज्ञात वायूची गळती झाल्याने एक आश्चर्यकारक आणि त्रासदायक अनुभव नागरिकांना आला. अचानकपणे हवेत पसरलेल्या या अज्ञात वायूमुळे वाहनचालकांच्या डोळ्यांना तीव्र जळजळ आणि घशाला असह्य त्रास जाणवू लागल्याने एकच खळबळ उडाली.
या रहस्यमय वायूगळतीचे नेमके कारण काय आहे, याबद्दल नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. काहींच्या म्हणण्यानुसार, पोलीस ग्राउंडमध्ये दंगा नियंत्रण सरावा दरम्यान अश्रूधुराच्या कांड्या फोडल्या गेल्यामुळे हा प्रकार घडला असावा. तर, काही नागरिकांचे म्हणणे आहे की, जवळच्या जलतरण तलावातील क्लोरीन वायूची गळती झाली असावी. मात्र, या दोन्ही शक्यतांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच, काही जागरूक नागरिकांनी तातडीने आमदार राजूमामा भोळे यांना संपर्क साधून अग्निशमन दलाला पाचारण करण्याची विनंती केली. त्यानुसार, अग्निशमन दलाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जलतरण तलाव तसेच पोलीस ग्राउंड परिसरात कसून तपासणी केली. मात्र, या तपासणीत त्यांना वायूगळतीचे निश्चित कारण आणि ठिकाण समजू शकले नाही. दुसरीकडे, पोलीस प्रशासनानेही या अज्ञात वायूगळतीबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही, ज्यामुळे नागरिकांमधील संभ्रम अधिक वाढला आहे.
या अज्ञात वायू गळतीमुळे रस्त्यावरून दुचाकी आणि इतर वाहनांनी ये-जा करणाऱ्या नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागला. अनेकांनी डोळ्यांना तीव्र जळजळ आणि घशाला खवखव तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना सांगितले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आणि अनेकजणांना आपले काम सोडून घराबाहेर थांबावे लागले. तर, काही वाहनचालकांना रस्त्यावर वाहन चालवणेही कठीण झाले. हा त्रासदायक प्रकार साधारणपणे अर्धा ते एक तास चालल्याने नागरिकांमध्ये नाराजीची भावनाही दिसून आली.
दरम्यान, पोलीस कवायत मैदानावर पोलिसांच्या दंगा नियंत्रण पथकाचा सराव सुरू होता, त्यामुळे याच सरावा दरम्यान काही रासायनिक वायूची गळती झाली असावी, अशी शक्यता काही नागरिकांकडून वर्तवली जात आहे. मात्र, जोपर्यंत पोलीस प्रशासन किंवा अग्निशमन दल या घटनेचे अधिकृत कारण स्पष्ट करत नाही, तोपर्यंत या रहस्याचा उलगडा होणे कठीण आहे. नागरिकांमध्ये मात्र भीती आणि संभ्रमाचे वातावरण कायम आहे.