
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील नागरिकांचे सर्वांगीण आरोग्य सुधारण्यासाठी आणि माता-बाल मृत्यूदरात घट करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाचा आजपासून जळगाव जिल्ह्यात शुभारंभ झाला आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले असून, गावपातळीवर आरोग्य जनजागृतीला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या अभियानासाठी ग्रामपंचायत हे मुख्य अंमलबजावणी केंद्र ठरविण्यात आले आहे. १ एप्रिल रोजी आयोजित विशेष ग्रामसभांमध्ये सर्व सरपंचांकडून अभियानाचा अधिकृत शुभारंभ करण्यात येत आहे. या माध्यमातून ग्रामस्तरावर आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, नागरिकांना नियमित आरोग्य तपासणीस प्रवृत्त करणे आणि स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्यास प्रोत्साहन देणे यावर भर दिला जात आहे.
या अभियानांतर्गत विविध आरोग्य तपासणी शिबिरे, स्वच्छता मोहिमा, तसेच माता व बालकांच्या आरोग्य सेवांचे बळकटीकरण यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि कुपोषण, आजारपण यांसारख्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
जिल्ह्यातील सर्व सरपंच आणि ग्रामसेवकांनी १ एप्रिल रोजी होणाऱ्या ग्रामसभांचे योग्य नियोजन करून या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी, अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि स्थानिक प्रशासनाचे समन्वयित प्रयत्न यामुळे या अभियानाला अधिक बळ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी सांगितले की, या अभियानामुळे ग्रामीण भागात आरोग्याविषयी सकारात्मक बदल घडतील. माता व बाल आरोग्य सुधारण्यासाठी विविध योजनांचा प्रभावी वापर केला जाईल आणि प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम बनविण्याचा प्रयत्न होईल.



