नवीदिल्ली, वृत्तसंस्था | तुम्ही पंतप्रधान पदासाठी माझ्या नावावर चर्चा करत आहात, तर मी अजुनही पक्षातील ज्युनिअर सदस्य आहे. माझ्यापेक्षाही अनेक वरिष्ठ नेते पक्षात आहेत. मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे स्पष्टीकरण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे.
तुम्ही नवे पंतप्रधानपदाचे दावेदार असू शकतात का ? नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर भाजपाची धुरा सांभाळण्यासाठी तुम्हाला तयार केले जात आहे का ? असे सवाल अमित शाह यांना करण्यात आले. यावर बोलताना आपल्यापेक्षाही दिग्गज नेते पक्षात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
पक्षात माझ्यापेक्षाही अनेक वरिष्ठ नेते आहेत. तसेच कोणताही निर्णय हा पक्षच घेत असतो. मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणे यशस्वी होवो आणि स्वातंत्र्यादरम्यान स्वातंत्र्य सैनिकांनी पाहिलेल्या भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचे आमचे ध्येय आहे, असेही शाह म्हणाले.
यावेळी त्यांनी कलम ३७०, नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरही भाष्य केले. कलम ३७०, एनआरसी आणि नागरिकत्व दुरूस्ती कलमासारखे कायदे हे काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातील आहेत. गेल्या ७० वर्षांपासून हे कायदे लागू होण्याच्या प्रतिक्षेतच होते. आता कोणत्याही निवडणुका नाहीत. आम्ही निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून हे निर्णय घेतले नाहीत. देशातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही आलो आहोत. आम्हाला राजकारण करायचे नाही तक देशाला उत्तम स्थान मिळवून द्यायचे आहे, असे शाह यांनी स्पष्ट केले.