मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतच्या वक्तव्यावरून राज्यपालांनी माफी मागावी यासाठी सत्ताधारी सदस्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केल्याने भगतसिंह कोश्यारी हे अभिभाषण न करता विधानसभेतून निघून गेल्याची घटना आज घडली. यातून राज्यपाल आणि महाविकास आघाडीतील संघर्ष शिगेला पोहचल्याचे दिसून येत आहे.
आज नवाब मलीक यांच्या राजीनाम्यावरून भाजप आक्रमक होणार असल्याचे संकेत आधीच मिळाले होते. या अनुषंगाने भाजपच्या सदस्यांनी आज विधीमंडळाच्या पायर्यांवर जोरदार आंदोलन केले. तर अकरा वाजता सभागृह सुरू झाल्यावर नियमानुसार राज्यपाल अभिभाषण करण्यासाठी उभे राहिले. याप्रसंगी मविआच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करून राज्यपालांनी शिवरायांवरून केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागावी अशी मागणी केली. याप्रसंगी जोरदार गदारोळ उडाला. यामुळे राज्यपाल अभिभाषण न करता अगदी राष्ट्रगीतालाही न थांबता भगतसिंह कोश्यारी हे सभागृहातून निघून गेले.
यानंतर महाविकास आघाडीच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करून राज्यपालांचा निषेध केला. याप्रसंगी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या आमदारांनी राज्यपालांचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करून घोषणाबाजी केली. यामुळे सभागृहाच्या पहिल्या दिवशीच मविआने राज्यपालांना लक्ष्य केल्याचे दिसून आले. याप्रसंगी एका आमदाराने चक्क शीर्षासन करून राज्यपालांचा निषेध केला.