मुंबई, वृत्तसंस्था | उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा आपल्याकडे आहेच. त्यावरुनच उगवत्या सूर्याला नमस्कार ! ही म्हणही पडली आहे. हाच प्रत्यय आला आहे तो शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या कार्यालयात. कारण देसाई यांच्या कार्यालयात आदित्य ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेसाठी, महाराष्ट्रासाठी दैवत आहेत. त्यामुळे त्यांचा फोटो असणे ही बाब अगदीच स्वाभाविक आहे. मात्र त्यांच्यानंतर थेट फोटो लावण्यात आला आहे तो नवनिर्वाचित शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांचा. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या एका ट्विटमध्ये हा फोटो दिसतो आहे.
सुभाष देसाई यांनी परळीतील पंचतारांकित MIDC च्या उभारणीच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय दिल्याचे ट्विट राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केले आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी सुभाष देसाई यांच्या कार्यालयात आदित्य ठाकरे यांचा फोटो लावण्यात आल्याचे स्पष्ट दिसते आहे. आदित्य ठाकरे यांनी वरळीतून विधानसभा निवडणूक लढवली. त्यात ते विजयीही झाले, नागपूर अधिवेशनात त्यांनी केलेले भाषणही गाजले. मात्र शिवसेनेत उगवत्या सूर्याला नमस्कार ही बाब नेत्यांनीही अंगिकारण्यास सुरुवात केली आहे असेच या फोटोवरुन दिसते आहे. कारण कोणताही पक्ष नवनिर्वाचित आमदाराचा फोटो काही कुणी आपल्या कार्यालयात लावत नाही.
राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी एमआयडीसीबाबत जमीन संपादित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याचे आदेश दिल्याबद्दल सुभाष देसाई यांचे आभार मानले आहेत. या संदर्भातले एक ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे. त्या ट्विटमधील फोटोत सुभाष देसाईंच्या कार्यालयात बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांचे फोटो स्पष्टपणे दिसत आहेत.