तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था) श्रीलंकेत बुरख्यावर बंदी घातली गेल्यानंतर भारतात याच मुद्द्यावर चर्चा सुरू असताना केरळमधील एका महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या बुरखा घालण्यावर बंदी घातली गेली आहे. विशेष म्हणजे केरळमधील मल्लपुरम येथे असलेल्या अल्पसंख्याक महाविद्यालयात ही बंदी घालण्यात आली आहे. हे महाविद्यालय मुस्लिम एज्युकेशन सोसायटीमार्फत चालवले जाते.
श्रीलंकेत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंका सरकारने चेहरा झाकणाऱ्या सर्व प्रकारच्या पेहरावांवर बंदी घातली. भारतात निवडणुकीच्या धामधुमीत या मुद्द्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्या ‘सामना’ या मुखपत्रातील संपादकीयातून बुरखा आणि नकाबबंदीची मागणी केली होती. मात्र, नंतर ही वर्तमानपत्राची व्यक्तिगत भूमिका असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.
भोपाळमधील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शिवसेनेच्या या मागणीचे समर्थन केले आहे. तथापि, भाजपने ही मागणी फेटाळून लावली आहे. अशा प्रकारच्या बंदीची आवश्यकता नसल्याचे भाजप प्रवक्त्याने म्हटले आहे.