मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहराजवळच्या मुक्ताई मंदिराच्या मागील बाजूस रस्त्याच्या बाजूला एका तरूणाचा मृतदेह छिन्नविच्छीन्न अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मुक्ताईनगर शहराजवळच्या संत मुक्ताई मंदिराच्या मागील बाजूस बोदवड रोडला लागूनच आज सकाळी एका तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे. या तरूणाच्या शरीरावर तीक्ष्ण हत्यार तसेच दगड वा तत्सम वस्तूने वार केल्याचे दिसून येत आहे. रस्त्यापासून थोड्या अंतरावर हा मृतदेह आढळून आला.
दरम्यान, पोलिसांना याची माहिती मिळताच सहायक पोलीस निरिक्षक संदीप दुनगहू यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे. या तरूणाची ओळख पटविण्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. तर या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात नोंद घेण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.