यावल-अय्यूब पटेल | लक्षावधी भाविकांचे श्रध्दास्थान असणार्या अट्रावल येथील श्री मुंजोबाच्या यात्रेला सोमवारपासून प्रारंभ होत असून यासाठी देवस्थान व प्रशासनाने चोख तयारी केली आहे.
जिल्हाच नव्हे तर देशातील लक्षावधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्यातालुक्यातील अट्रावल येथील, मुंजोबाच्या यात्रेस सोमवार पासून प्रारंभ होत आहे. देवस्थानच्या वतीने यात्रेची परिपूर्ण तयारी झाली असून यात्रा स्थळी व्यावसायिकांनी दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षेच्या कारणावरून फैजपुर उपविभागीय पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे येथील यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, यावल एस.टीआगाराचे व्यवस्थापक प्रमुख दिलीप महाजन, यावल आगाराचे वाहतूक अधीक्षक प्रमुख जितेंद्र जंजाळ यांनी शुक्रवारी रात्री यात्रा स्थळाची पाहणी करत विश्वस्तांना सूचना केल्या आहेत.
कोरोनामुळे तीन वर्षानंतर तीन वर्षानंतर यंदा या वर्षी प्रथमच श्रीमुंजोबा महाराज यांची आधीप्रमाणेच यात्रा भरत असल्याने यात्रेत मोठी गर्दी राहणार आहे. या अनुषंगाने देवस्थान समितीने चोख व्यवस्था केली आहे. तालुक्यातील अट्रावल येथील प्रसिद्ध मुंजोबा मंदिर म्हणजे नवसाला पावणारा अशी भाविकांची श्रद्धा आहे. लगतच्या बर्हाणपूर जिल्ह्यासह जिल्ह्यातील भाविक यात्रेत हजेरी लावतात. माघ महिन्यातील सोमवार व शनिवार सह पोर्णिमेला ही यात्रा भरते. यावर्षी यात्रेचे पौर्णिमेसह पाच वार पडत आहेत. यात २३जानेवारी(सोमवार), २८जानेवारी (शनिवार), ३०जानेवारी (सोमवार) ,४फेब्रुवारी (शनिवार), ५ फेब्रुवारी (पोर्णिमा) अशा पाच दिवशी मुंजोबाची यात्रा भरणार आहे.
अट्रावल येथील मुंजोबाच्या मंदिरात मान देण्याची प्रथा आहे. मुंजोबाला इच्छित मागणे मागितल्यानंतर त्याची कार्यसिद्धी होताच त्या कुटुंबाकडून मुंजोबाला यात्रेत मान देण्याची प्रथा आहे यात रोडगे, वरण ,भात व वांग्याच्या भाजीचे जेवण दिले जाते. यात्रेत असे मान देणार्या कुटुंबीयांची संख्या शेकडोने असल्याने यात्रा स्थळी जिकडे-तिकडे जेवणावळीच्या पंक्ती दिसून येतात. भाविकांना येथे येण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यावल, भुसावळ, फैजपूर, रावेर येथून एसटी बसेस सोडल्या जातात. येथील पोलीस ठाण्याकडून यात्रास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो यासह देवस्थानचे स्वयंसेवक बंदोबस्तासाठी तैनात केले जातात.